" आम्ही कुणाच्यात जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यात या,"; विलिनीकरणावर शरद पवारांची स्पष्ट भूमिका

Foto
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट) पक्षाची नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि दुष्काळ निवारणासाठी काय उपाययोजना करता येतील, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या तसेच एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांवर मोठे व स्पष्ट विधान केले आहे.

बैठकीत बोलताना शरद पवार म्हणाले की, "मघाशी बोलताना प्रांताध्यक्षांनी एक वाक्य वापरले, ते बोलता बोलता असे बोलले की, आमच्यामध्ये काही उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. पक्षाचा प्रमुख म्हणून मी स्पष्ट सांगतो की, ज्या चर्चा सुरू आहेत त्या म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्ष हा शक्तीशाली करणार. 

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत आणि इतर चर्चांवर भाष्य करताना शरद पवार यांनी रोखठोक भूमिका मांडली. ते म्हणाले की, "पण तुम्ही आमच्या जवळ आले तर नाही तर ज्यांना यायचं असेल त्यांनी आमच्यात यावे, आम्ही कुणाच्यात जाणार नाही आणि आमचा पक्ष हा स्वतंत्र पक्ष म्हणूनच लढणार आहे. " पक्षाच्या भूमिकेबाबत घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

शरद पवारांचे दुष्काळी परिस्थितीवर भाष्य...
दुष्काळाच्या निमित्ताने सरकारने तुमचे हात बळकट करणे गरजेचे आहेत. दुष्काळाच्या निमित्ताने काही निर्णय राज्यात होत असले तरी केंद्रात देखील काही निर्णय होत असतात. मी केंद्रीय मंत्रिमंडळात होतो त्यावेळी पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांनी बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी बैठकीत सांगितलं होतं दुष्काळात काय निर्णय घ्यायचे याचे सर्वाधिकार खासदारांना द्या. मंत्रिमंडळ संमती न घेता ते अधिकार द्या. त्यावेळी मी जालना जिल्ह्यात गेलो होतो त्यावेळी राजेश टोपे होते त्यांनी सांगितलं होतं, मोसंबी बागा मोठ्या प्रमाणात आहेत. त्यावेळी एक गोष्ट कळली होती, मोसंबीला कधीही मदत मिळाली नव्हती. त्यावेळी मी दिल्लीत गेल्यावर निर्णय घेतला की मोसंबी पिकाला 25 हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले. तुम्ही थकबाकीदार असाल तर नवीन कर्ज तुम्हाला मिळणार नाही. याबाबत शेतकऱ्यांमधे जनजागृती होणे गरजेचे आहे. 265 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. बाकी जिल्हे त्यात नाहीत. केळी पिकाला मदत नाही. याबाबत नोंद घेणे गरजेचे आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. 

महाराष्ट्र मधे AI शिकवण्यासाठी पहिली संस्था बारामतीत स्थापन केली आहे. नुकताच त्या संस्थेत गेलो होतो दारातून आत गेलो तेव्हा दोन  रोबोटनी मला सॅल्यूट मारला. त्यांनी अनेक गोष्टी मला करून दाखवल्या. जगात अनेक प्रश्न कृत्रिम बुद्धिमत्ता सोडवू शकेल. त्यामुळे ते शिकायला लागेल किमान आपण तो विषय समजून घ्यायला हवे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.  जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं निवडणुक प्रक्रियेत काय होतं आहे. भविष्यात AI किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता संबंधित साधणं निवडणुकीत वापरली जातील. त्यामुळे मी अध्यक्षांना याबाबत सांगितलं आहे. आपल्यालादेखील याबाबत काहीतरी करावं लागेल. माझ सांगणं आहे की, याबाबत छापून येणारे लेख वाचा समजून घ्या. आपल्याला हे समजून घ्यायची मानसिकता करावी लागेल, असा सल्ला शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांना दिला.